इंदापूर: पुणे, सोलापूर व अहमदनगर आदी जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ५ ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या साखळी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याची आवक झाली. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे उजनी धरण वजामधून प्लसमध्ये आले होते. २५, २६ जुलै रोजी उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणामधून येऊ लागला होता. २६ जुलै रोजी उजनी धरण प्लसमध्ये आले. त्यानंतर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे धरणात पाण्याचा विसर्ग वाढता राहिला.
सावधानतेचा इशारा…
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. उजनी धरण जलाशय शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये एक लाख वीस हजार क्युसेकने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेतीपंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, अशी सूचना उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.