संतोष पवार
पळसदेव : पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाने अखेर शंभरी पार केली आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. उन्हाळ्यातील तीव्र तापमान आणि वैशाख वणव्याच्या झळांनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.
तथापि जुलै महिन्याच्या अखेरीस घाटमाथ्यावर आणि पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा पात्रात होत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही समाधानाची बाब आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या उसाच्या पिकांमुळे सहकारी साखर कारखानदारीला अर्थकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 121.20 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 57.54 टीएमसी इतका झाला असून उजनी धरण 107 % भरल्याने आणि उजनीत येणारा विसर्ग ११६५०६ क्यूसेक्स इतका झाल्याने उजनी मधून सीना माढा, दहिगाव, कॅनॉल, वीज निर्मिती, भीमा नदी पात्र आदि प्रकल्पांकरिता विसर्ग सोडला जात आहे.
उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या आणि ओलिताखाली असलेल्या क्षेत्रातुन पिकांचे योग्य नियोजन करणे आता शेतकऱ्यांना सोयीचे जाणार आहे. त्यामुळे उत्पादनात निश्चित अशी वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे.