पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शिवरामनगर परिसरात कोहिनूर प्लाझा इमारतीवर शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाच वाजता छापा टाकून व्यवसायायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी युगांडा देशातील तरुणीची सुटका केली आहेत. तर तरुणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील किरण मोरे (वय-२५, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिवरामनगर परिसरात कोहिनूर प्लाझा या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी खात्री करून छापा टाकला असता पोलिसांना युगांडा देशातील तरुणी वेश्या व्यवसाय करताना आढळून आली. पोलिसांनी तरुणीची सुटका करून आरोपी निखील मोरे याला अटक केली.
दरम्यान, आरोपी निखील मोरे याने तरुणीला पैशाचे आमिष दाखवून आणले होते. त्यानंतर तिला जास्त पैसे देऊ असं सांगत वेश्याव्यवसाय करून घेत होता. तरुणीला वेश्याव्यवसाय करायला लावून निखील पैसे कमावत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.