सातारा : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात 20 जणांना तिकीट देण्यात आलं आहे. या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सातारा हा उदयनराजेंचा बालेकिल्ला आहे, असं असतानाही साताऱ्याची सीट जाहीर न केल्याने उदयनराजे समर्थक अस्वस्थ आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थावर जमून या समर्थकांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रात्रीच राजीनामे तयार केले आहेत. पुढील काळात उदयनराजे यांचे नाव जाहीर न झाल्यास आम्ही पदांचे राजीनामे देऊ, असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
भाजपने प्रसिद्ध केलेल्या यादीत हीना गावित, स्मिता वाघ, रक्षा खडसे यांच्यापासून ते पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांची नावे आहेत. सुजय विखे पाटील यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. पण या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट जाहीर न केल्याने मराठा समाज प्रचंड नाराज झाला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.
साताऱ्याच्या पोवई नाका येथील शीवतीर्थावर मराठा समाज एकवटला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर या कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाने घोषणा दिल्या. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. उमेदवारी मिळत नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी रात्रीच राजीनामे तयार केले आहेत. पुढील काळात उदयनराजे यांचं नाव जाहीर न झाल्यास आम्ही पदांचे राजीनामे देऊ, असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे. उमेदवारी जाहीर न झाल्यास उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.