लोणी काळभोर : मागील 33 वर्षांपासून पुणे शहर दलात काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे लोणी काळभोरचे (ता. हवेली) सुपुत्र उदय सुदाम काळभोर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उदय काळभोर यांचे वडील यांनी देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्त्यव्य बजाविले आहे. वडिलांनंतर मुलगाही पोलीस उपनिरीक्षक झाल्याने हे पद भूषविणारी बापलेकाची लोणी काळभोरमधील ही पहिली जोडी ठरली आहे.
उदय काळभोर यांच्या वडिलांचे नाव सुदाम काळभोर, तर आईचे नाव विमल आहे. सुदाम काळभोर यांनीसुद्धा पोलीस दलात कर्त्यव्य बजावले होते. सुदाम काळभोर हे पोलीस उपनिरीक्षक असताना सेवानिवृत्त झाले होते. उदय काळभोर यांचा जन्म 1 जून 1968 साली झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कदमवाक वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधून घेतले. तर हडपसर येथील अण्णासाहेब मगर कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण सन 1990 साली पूर्ण केले.
दरम्यान, वडील सुदाम काळभोर हे पोलीस अधिकारी असल्याने मोठे झाल्यावर पोलीस बनायचे, हे बाळकडू उदय काळभोर यांना घरातूनच मिळाले. त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सन 1991मध्ये पोलीस भरतीची परीक्षा दिली. या परीक्षेत उदय काळभोर उत्तीर्ण झाले आणि 16 डिसेंबर 1991 पासून ते पुणे शहर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. काळभोर यांनी शहर पोलीस मुख्यालयात 9 वर्ष, पुणे शहर वाहतूक विभागात 3 वर्ष, विश्रामबाग पोलीस ठाण्यात 1 वर्ष, वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 6 वर्ष कर्त्यव्य बजावले. या कालावधीत त्यांना नाईक व पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाली.
त्यानंतर उदय काळभोर यांनी खंडणी विरोधी पथकात 3 वर्ष, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात तीन वर्ष सहाय्यक फौजदार म्हणून कर्तव्य बजावले. उदय काळभोर यांनी 33 वर्षाच्या कालावधीत 120 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. आता सहाय्यक फौजदार पदावरून पदोन्नती होऊन त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. उदय काळभोर हे लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारणार आहेत.
उदय काळभोर यांना शिक्षणाची आवड असल्याने कर्त्यव्य बजावीत असताना, वेळ काढून त्यांनी वकिलीची सनदही घेतली आहे. उदय काळभोर हे सध्या पुणे येथील दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेडचे विद्यमान खजिनदार आहेत. काळभोर यांना दोन मुले आहेत. मुलगी ऋतुजा या आयटी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तर मुलगा ऋत्विक हा सिविल इंजिनियर आहे. तर त्यांची पत्नी राजश्री काळभोर या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आहेत. लोणी काळभोर गावचाच सुपुत्र जन्मभूमीत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजाविणार असल्याने, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.