पुणे: महाराष्ट्र विधानसभानिवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहे. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. तर दुसरीकडे महविकास आघाडीतील नेत्यांवर महायुतीने देखील लक्ष ठेवण्यात येत आहे. आता शिवसेना उबाठामधील महत्वाचा नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या नेत्याला थेट विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे. शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश सोहळाही लवकरच पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
उबाठाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेणार आहे. त्यानंतर कटके शिरुर विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्या पुढे आव्हान उभे करण्यासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांना रिंगणात उतरवले जाणार आहे. आमदार पवार यांचे २००९ ते २०१४ आणि त्यानंतर २०१९ पासून त्यांचे वर्चस्व या मतदारसंघावर आहे. ते मोडून काढण्यासाठी अजितदादांकडून माऊली कटके यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यामुळे ते शिरुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अजित पवार यांनी बारामतीतूनच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आमदार अशोक पवार यांना आव्हान देण्यात येणार आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून शिरुर हवेली मतदारसंघात आखणीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे माऊली आबा कटके यांचा जाहीरपणे पक्ष प्रवेशही लवकर होणार असल्याची चर्चाही सुरु आहे.
आमदार अशोक पवारांनी दिले होते अजित पवार यांना आव्हान
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याबद्दल काही दिवसांपूर्वी आमदार अशोक पवार यांनी विचारण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, माझी कोणाविरुद्धही लढण्याची पूर्ण तयारी आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शिरूरमध्ये कुणीही येऊन निवडणूक लढू शकतो.
प्रदीप कंद यांची भूमिका काय ?
पुणे जिल्हा बँकेचे संचालक आणि भाजप नेते प्रदीप कंद हे देखील शिरूर-हवेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यानुसार त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. मध्यंतरी महायुतीमध्ये ही जागा भाजपाला सुटणार अशी देखील चर्चा होती. अशातच ही जागा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच उबाठाचे माऊली कटके अजित पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजप नेते प्रदीप कंद हे काय भूमिका घेणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.