पिंपरी-चिंचवड: शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (१० जानेवारी) निकाल दिला. त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये नार्वेकर यांना श्वानाची उपमा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत रास्ता रोको होऊ दिला नाही. त्यामुळे पोलीस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी अध्यक्ष नार्वेकर यांना श्वानाची उपमा देणारे फलक छापण्यात आले होते.
शिवसेना कुणाची आणि शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल नार्वेकरांनी बुधवारी सायंकाळी निकाल दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचून दाखवत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हणत त्यांचे १६ आमदार पात्र असल्याचं स्पष्ट सांगितल आहे. त्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत. एकीकडे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असल्याचं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील राजकारण ढवळून निघणारा हा निकाल बघून अनेक नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोकोचा प्रयत्न केला.