पुणे : येथील एका साहसी पर्यटन केंद्रातील जलतरण तलावात बुडून एर्नाकुलम येथील दोन तरुणांच्या मृत्यू झाला होता. २५ ऑक्टोबर २०२० रोजी ही दुर्घटना घडली होती. पर्यटन केंद्रातील व्यवस्थापनाने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडल्याची तक्रार मुलांच्या आई-वडिलांनी दिली होती. याप्रकरणी केरळमधील एर्नाकुलम येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाने एक कोटी ९९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पर्यटन केंद्राने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे निरीक्षण नोंदवून, नुकसानभरपाईचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहितीनुसार, एर्नाकुलम येथील कुटुंब पुण्यातील साहसी पर्यटन केंद्रात आले होते. या पर्यटन केंद्रात सुरक्षाविषयक उपाययोजना केल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात तेथे जीवरक्षक नव्हते, तसेच कोणत्याही सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. पर्यटन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे जलतरण तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मुलांच्या आई-वडिलांनी दिली होती. सीसीटीव्ही कॅमेरे देखील नादुरुस्त असल्याचे म्हटले होते. पालकांच्या तक्रारीनंतर साहसी पर्यटन केंद्राच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दोन मुलांचा मृत्यू तसेच सदोष सेवा दिल्याने मुलांच्या आई-वडिलांनी एर्नाकुलम येथील ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दावा दाखल केला होता. त्यांनी सहा कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. एर्नाकुलम येथील ग्राहक तक्रार निवारण मंचात दाव्यावर सुनावणी झाली. ग्राहक तक्रार निवारण मंचाने साहसी पर्यटन केंद्राच्या व्यवस्थापनाला एक कोटी ९९ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाईची रक्कम १२ टक्के व्याजाने परत देण्याचे आदेशात म्हटले आहे.