पिंपरी : नाश्ता करण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने उडवल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेदहाच्या सुमारास वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ हा अपघात झाला. अविनाश व्यंकटेश तलवार (वय २०), रमेश अध्याप्पा म्हेत्रे (वय १९, दोघे रा, गांधीनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश व रमेश हे पिंपरी येथे एका शोरूममध्ये कामाला आहेत. ते मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नाश्ता करण्यासाठी वल्ल्भनगर येथे निघाले होते. दरम्यान एसटी स्थानकाजवळ आले असता एका भरधाव ट्रकने त्यांना उडवले. यामुळे रस्त्यावर जोरात पडल्याने व डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी सांगितले.