लोणी काळभोर: खेळता खेळता तोल जाऊन २ वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील अष्टापूर मळा रस्त्याच्या परिसरात शनिवारी (ता.६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात एच शोककळा पसरली आहे.
प्रिन्स चंदनकुमार कोशले (वय-२, लोणी काळभोर, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्वराज हॉस्पिटलच्या डॉ. पल्लवी साळुंखे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदनकुमार कोशले हे परप्रांतीय कुटुंब असून ते कामाच्या शोधात लोणी काळभोरमध्ये आले होते. त्यानंतर त्यांना बांधकाम मजूर म्हणून काम मिळाल्याने ते लोणी काळभोर परिसरात राहू लागले. दोघे पती-पत्नी बांधकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
दरम्यान, प्रिन्स हा नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खेळत होता. प्रिन्सचा खेळता खेळता तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत जाऊन पडला. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले व लोणी काळभोर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.