चिखली (पिंपरी): ज्वेलर्स शॉपमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी सेल्समनची नजर चुकवून 40 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घडली. या प्रकरणी सेल्समन महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चिखलीमधील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या दुकानात दोन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या. त्यांनी नाकातील जाडसर डिझाईनच्या चमकी दाखवा, असे फिर्यादीस सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिला दुकानातील सोन्याच्या चमकी दाखवत होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवून ग्राहक बनून आलेल्या महिलांनी 40 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम 360 मिलिग्रॅम वजनाचे सोन्याच्या चमकीचे एक पाकीट चोरून नेले. याबाबत चिखली पोलीस तपास करीत आहेत.