लोणी काळभोर : उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून दुचाकी चोरणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका अट्टल चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करून दोन दुचाकींसह १ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
कासीम सलीम इराणी (वय २५, रा. पठारे वस्ती, इराणी कॉलनी, लोणी काळभोर, ता.हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ग्रीन व्हॅलीजवळ पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १३ मार्च २०२४ रोजी घडली होती.
याप्रकरणी फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दोन पथके तयार करून आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कासीम इराणी असल्याचे माहिती पोलीस अंमलदार विष्णू सुतार, यतिन भोसले, गोपाल मदने यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, पोलिसांनी सापळा रचून आरोपी कासीम इराणी याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी कासीम इराणी यास ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हा हा त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने केला. तसेच आरोपीने आणखी एक वाहनचोरीचा गुन्हा केल्याची पोलिसांना कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यातील १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांच्या पथकाने केली.