लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पायी चाललेल्या वाटसरू महिलेला एका दुचाकीने जोरदार धडक दिली आहे. ही घटना कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी स्वीट होम समोर घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. गौरी भिमराज वाणी (वय 46, जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी वाणी या गुरुवारी (ता.23) कुंजीरवाडी येथील आधार कार्ड केंद्रावर आधारकार्ड दुरुस्ती करण्यासाठी गेल्या होत्या. आधार कार्ड दुरुस्तीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाणी या परत निघाल्या होत्या. दरम्यान, वाणी या पायी जात असताना त्यांना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या घटनेत वाणी या गंभीर जखमी झाल्या.
अपघातात जखमी झालेल्या वाणींना नागरिकांनी तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी वाणींच्या तपासण्या केल्या असता त्यांचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गौरी वाणी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय जाधव करीत आहेत.