उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी येथील हॉटेलमधील परमिट रुममध्ये पिलेल्या दारूचे बिल मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी दोघांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. त्यावेळी शिवीगाळ व दमदाटी करुन तसेच बारच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच हॉटेलच्या बाहेर लावलेल्या आय – 20 व फाँर्च्युनर या दोन गाड्यांचेही नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 6 जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. 29) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
स्वप्निल चौधरी (रा. पेठ वडाची वाडी ता. हवेली), यश (पुर्ण नाव माहीत नाही), नंदु उर्फ हनुमंत चोरगे (रा. म्हातोबाची आळंदी ता. हवेली), यश संपत चैधरी (रा. वडाची वाडी पेठ ता. हवेली) शिवम शिवरकर (रा. म्हातोबाची आळंदी ता. हवेली) उत्कर्ष बाबर (रा. सोरतापवाडी, कडवस्ती ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहन वासु गौड (वय 43, मँनेजर रा. हाँटेल अभिराज नायगाव फाटा, सोरतापवाडी ता. हवेली, मुळ गाव महाराज बिल्डींग ब्राम्हनगर ता. माझगाव जि. बेळगाव, राज्य – कर्नांटक) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन गौड यांनी परमिट रूममध्ये पिलेल्या दारूचे बिल मागितल्याच्या कारणावरून स्वप्नील चौधरी व नंदु उर्फ हनुमंत चोरगे यांनी गौड व महेश पोपट चौधरी यांना लोखंडी पाईपने मारहाण व दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच शटरवर दगडफेक केल्याने त्यातील दगड हॉटेलमधील कामगार बबलु अंन्सारी यास लागून जखमी केले.
यावरती न थांबता आरोपींनी बारच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच आय 20 कार व फाँर्च्युनर कारवर दगडाने हल्ला केला. व यामाहा मोटारसायकल ने डँश देऊन नुकसान केले.
दरम्यान, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकातील हॉटेल आशीर्वादच्या शेजारी दहा दिवसांपूर्वी यातील काही आरोपींनी किरकोळ कारणावरून लाथा बुक्क्यांनी तसेच दगड व विटाच्या सहाय्याने तिघांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी याच आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहन गौड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहाजणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.