नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावातील सभापती कॉर्नरला दोन चोरट्यांनी महिलेचे पावणेदोन तोळ्यांचे मंगळसूत्र तसेच वारूळवाडी येथे साधूंच्या वेशात असलेल्या दोन तरुणांनी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला संमोहित करून गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २१) घडल्या आहेत.
विजया सचिन वाजगे (वय ३६, रा. कोल्हेमळा, नारायणगाव) बुधवारी (दि. २१) सायंकाळी सातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर सभापती कॉर्नरला नारायणगावच्या दिशेने दुचाकीवर जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी विजया वाजगे यांचे गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढत चोरून ते चोरटे दुचाकीवरून आळेफाट्याच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी नारायणगाव पोलिसांना दिली.
दुसऱ्या घटनेत २१ ला वारूळवाडी येथील वळणवाडी हद्दीत सकाळी मंगल विलास भुजबळ (वय ६५) या घरी असताना साधूच्या वेशात असलेले दोन तरुण घरी आले असता त्यांनी मंगल भुजबळ यांच्यासमोर हातचलाखीने गुलाबाचे फूल, काचेची पिंड, रुद्राक्ष अशा पाच वस्तू हातातून काढून भुजबळ यांच्या हातात ठेवली. त्यानंतर एक विशिष्ट प्रकारच्या पावडरची फुंकर दोन वेळा भुजबळ यांच्या तोंडावर मारून त्यांना संमोहित केले व घरातील सोन्याचे मंगळसूत्र आणण्यास सांगून १५ मिनिटांनी आणून देतो असे म्हटले. त्यांनी भुजबळ यांच्याकडून दीड तोळ्याचे मंगळसूत्र काढून घेतले. त्यावेळी भुजबळ यांना काही कळायच्या आत ते साधूंच्या वेशातील अज्ञात चोरटे एका दुचाकीवरून पसार झाले.