Pune News: लोणी काळभोर (पुणे): राज्यात तलाठ्यांची पाच हजाराहुन अधिक पदे रिक्त असल्याने, एकेका तलाठ्याला एकापेक्षा जास्त तलाठी सजाचा कारभार सांभाळावा लागत असल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रात आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील एका बड्या व सधन तालुक्यातील एकाच तलाठी सजामध्ये मागील आठ महिन्यांहून अधिक काळ चक्क दोन तलाठी कार्यरत असल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आला आहे.
“पुणे प्राईम न्यूज”ला पुणे जिल्हातील एका तलाठी सजासाठी मागील आठ महिन्यांहून अधिक काळ चक्क दोन तलाठी कार्यरत असल्याचे भक्कम पुरावे मिळाले असुन, एका प्रांत अधिकाऱ्याने “प्रोटोकॉल”च्या लालसेपोटी प्रशासनाला एकाच तलाठी सजाच्या नावाखाली दोन तलाठ्याचा पगार काढायला लावल्याचे पुढे आले आहे. संबधित प्रांतने एकाच तलाठी सजाच्या नावाखाली दोन तलाठ्याचा पगार काढायला लावून, स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाला पध्दतशीरपणे लाखों रुपयांचा चुना लावल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची निपक्ष चौकशी होऊन, शासनाला चुना लावणाऱ्या प्रांतच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
“पुणे प्राईम न्यूज”च्या माध्यमातून हवेली तालुक्यातील थेऊर सर्कल कार्यालयातील मंडल अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांच्या भ्रष्टाचाराचे किस्से नागरीकांच्यासमोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका प्रांत अधिकाऱ्याने “प्रोटोकॉल”च्या लालसेपोटी प्रशासनाला एकाच तलाठी सजाच्या नावाखाली दोन तलाठ्याचा पगार काढायला लावल्याचे भक्कम पुरावे “पुणे प्राईम न्यूज “च्या हाती लागल्याने, भ्रष्टाचाराच्या हिमनगाच्या टोकाची व्याप्ती तलाठी कार्यालयापासून वरिष्ठ कार्यालयाकडे सरकू लागली आहे. दरम्यान तलाठी कार्यालयात काम करतोय एक तलाठी, मात्र पगार घ्यायला दोन तलाठी अशी येडीगबाळी अवस्था प्रांतने केली आहे. कुंपणच शेत खायला लागल्याने न्याय कोठे मागायचा, हा प्रश्न पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.
आजपर्यंत महसूलमधील अधिकारी व कर्मचारी शासकीय कामासाठी पैसे घेतात, त्यासाठी कामाला ‘विलंबाची खुटी’ मारतात हे अनेकांनी ऐकलं व पाहिलेलं आहे. त्याबाबतचे पुरावे म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ क्लिप ‘पुणे प्राईम न्यूज’ने व्हायरल केलेले आहेत. कोतवाल, तलाठी व सर्कल यांच्या भ्रष्ट कारभाराची शेतकऱ्यांनी पोलखोल करुनही वरिष्ठ अधिकारी तोंड उघडत नाही. वरिष्ठ अधिकारी तलाठ्यांच्या बदल्यांचा उद्योग का व कशासाठी करतात? हे आता उघड होऊ लागल्याने महसूलच्या अब्रुचा पंचनामा होत आहे.
राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. यामुळे आजच्या घडीला पाच हजाराहुन अधिक पदे रिक्त असल्याने, एकेका तलाठ्याला एकापेक्षा जास्त तलाठी सजाचा कारभार सांभाळावा लागत आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्न सोडविण्याची जबाबदारी तलाठ्यांकडे आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील तलाठी वर्गात यावरुन मोठी नाराजी आहे. पुणे जिल्ह्यातही तलाठ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने, तलाठ्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करावे लागत आहे. असे असले तरी, पुणे जिल्ह्यातील एका बड्या व सधन तालुक्यात मात्र एका तलाठी सजासाठी मागील आठ महिन्यांहून अधिक काळ चक्क दोन तलाठी कार्यरत असल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आला आहे.
“पुणे प्राईम न्यूज”ला मिळालेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांपूर्वी एका तलाठ्याच्या विरोधात तक्रार आल्याने, त्याच तालुक्याच्या प्रांत अधिकाऱ्याने संबधित तलाठी महोदयांचे निलंबन केले. तसेच निलंबित केलेल्या तलाठ्याच्या जागी दुसऱ्या उपविभागातून म्हणजे ९२ किलोमीटर अंतरावरील तलाठ्याला आयात करुन रिक्त झालेला तलाठी सजाचा पदभार दिला. यासाठी नवनियुक्त तलाठ्याकडून दश लक्ष मोलाचा मजबूत प्रोटोकॉल संबंधित प्रांत अधिकाऱ्याने घेतल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान निलंबित झालेल्या तलाठ्याने चुकीच्या निलंबनाबाबत मॅट कोर्टात दाद मागितली. याबाबत मॅट कोर्टाने तलाठ्याचे केलेले निलंबन चुकीचे ठरवून संबधित तलाठ्याला पूर्वीच्याच ठिकाणी पदभार देण्याबाबत आदेश दिले.
दरम्यान मॅटने आदेश दिला असला तरी, जुन्या तलाठी महोदयाच्या जागी नवीन नियुक्ती केलेल्या तलाठ्याचा लाख मोलाचा प्रोटोकॉल परत करण्याची नामुष्की नको म्हणून प्रांत महोदयांनी नवनियुक्त तलाठ्याची दुसरीकडे बदली न करता दुसऱ्याही तलाठ्याला फक्त कागदावरच त्याच तलाठी कार्यालयाचा पदभार सोपवला. येथूनच खऱ्या अर्थाने सारीपाटावरील फासे उलटे पडले. यामुळे एका तलाठी कार्यालयाला कागदावर दोन तलाठी मिळाले.
मात्र संबंधित प्रांताच्या वैयक्तिक प्रोटोकॉलच्या लाभापायी आणि गंभीर चुकीमुळे शासनाच्या पैशांचा अपव्यय होऊन दोन्ही तलाठ्यांना मागील आठ महिन्यांपासून पगार दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील प्रोटोकॉलच्या नियमांचे तंतोतंत पालन केलेला एक तलाठी, तलाठी कार्यालयात असून त्याचीच डिजीटल स्वाक्षरी कार्यरत आहे. परंतु, त्याच तलाठी कार्यालयात दुसरा तलाठी प्रत्यक्ष हजर नसताना पगार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याकामी प्रांत अधिकाऱ्याने घेतलेल्या मालामाल भूमिकेमुळे महसूलमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज”च्या प्रतिनिधीने संबधित तालुक्याच्या तहसिलदार महोदयांना नेमकी विचारणा केली असता, संबधित तहसिलदार महोदयांनी आपल्याला याबाबत कसलीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणाला विलंबाची खुटी न मारता कागदावर असलेल्या दोन तलाठ्यांपैकी पुर्वी निलंबित केलेल्या तलाठ्याची तात्काळ बदली करुन, संबधित तलाठी महोदयांना चार्ज सोडण्यास सांगिंतले. संबधित तलाठी महोदयांनी प्राताधिकारी व तहसिलदार यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत अवघ्या दोन तासात आपल्या नवीण जागी हजर होण्याची तत्परता दाखवली.
हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर व कदमवाकवस्ती या दोन मोठ्या गावांसाठी पुर्णवेळ तलाठी मिळावा, यासाठी ग्रामस्थ मागील काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष करत, लोणी काळभोरसाठी ३० किलोमीटरवरुन आयात केलेल्या अर्धवेळ तलाठ्याची नेमणूक केली जाते, तर दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील एका तलाठी कार्यालयासाठी दोन पुर्णवेळ तलाठ्यांची नेमणूक केलेली आहे. यातील एका तलाठ्याला दुसऱ्या उपविभागातून ९२ किलोमीटर अतंरावरुन आयात केले जाते, एवढा खटाटोप कोण कशासाठी व का? करतंय याचा अंदाज नागरिकांना आला आहे.
मुळात तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार नसतानाही हवेली तहसील कार्यालयाने लोणी काळभोरच्या तलाठ्याची बदली का केली? याची चौकशी होण्याची गरज आहे. थेऊर सर्कलसाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने एका राजकीय नेत्याने दबाव आणल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. तलाठी सारख्या महसुल खात्यातील कनिष्ठ पदासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने दबावतंत्र एखादा अधिकारी वापरत असेल, तर संबधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.