दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे दोन एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल २५ ते ३० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंड गावाजवळील कौठीचा मळा येथे आज (दि. २८) दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरवंड गावच्या हद्दीतील कौठीचा मळा येथे दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. सोलापूर च्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसला एका दुचाकीस्वार आडवा आला. त्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी बस दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडकली.
या अपघातात दोन्ही बसमधील २५ ते ३० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. अपघातस्थळी दौंडचे आमदार राहुल कुल आणि यवत पोलिसांनी भेट देत मदत कार्य सुरू केले आहे. आमदार राहुल कुल यांनी प्रशासकीय यंत्रनेला सुचना देत जखमी व्यक्तींना योग्य त्या रुग्णालयात दाखल करून त्वरित उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी बसचा चक्काचुर झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.