सासवड: अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या नावाखाली स्वतःसाठी अर्थपूर्ण संबंध निर्माण केल्याचा ठपका ठेवून सासवड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहेत. हे आदेश पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी (ता.21) दिले आहेत.
लियाकतअजी युनुस मुजावर व गणेश विलास पोटे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. लियाकतअजी मुजावर हे सासवड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तर गणेश पोटे हे पोलीस नाईक म्हणून त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यावर कारवाईच्या माध्यमातून स्थानिक समाजकंटकांशी संधान साधुन अत्यंत घनिष्ठ मैत्री निर्माण केली आहे. ते अवैध धंद्यावरील कारवाईच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध निर्माण करीत असल्याचे दिसून आलेले आहे.
पोलीस हवालदार लियाकतअजी मुजावर व पोलीस नाईक गणेश पोटे या दोघांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलने केली आहेत. तसेच त्यांच्या अनेक तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झालेली आहे, असे प्राथमिक चौकशीअंती दिसून आलेले आहे. अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केले आहे. त्याअनुषंगाने शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांना “शासकिय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सासवड पोलीस ठाण्यातील वजनदार आका व बोका यांचे अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक लागेबांध असल्याचे दिसून आले आहे. दोघांनीही अवैध धंद्यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे ते दोघेसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रडारवर असून त्यांची पोलीस खात्यांतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सासवड पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यावर कारवाई होणार?
मागील दोन तीन दिवसांपासून सासवड पोलीस ठाण्यातील अवैध धंद्यांचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे सासवड पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांना पोलीस ठाण्यातील कनिष्ठ अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा एवढे मोठे धाडस पोलीस कर्मचारी करू शकणार नाहीत. त्यामुळे सासवड पोलीस ठाण्याचा कारभार हाकणाऱ्या कारभाऱ्यावर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे