पुणे : येथील डेक्कन परिसरातील एल-3 लिक्विड लीजर लाउंज या पब बारमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्या प्रकणी गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिका-यांचे निलंबन करण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील अशी निलंबित पोलीस अधिका-यांची नावे आहेत.
एल 3 हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य पार्टी रंगलेली होती. या पार्टीमध्ये काही तरुण स्वच्छतागृहात जाऊन ड्रग्स घेत होते. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हे सर्व प्रकार अद्याप देखील सुरू असल्याचे समोर आले. या हॉटेलमध्ये अनेक अल्पवयीन मुलांना देखील दारू देण्यात आल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत यासंदरर्भातील माहिती दिली आहे. यावेळी मोहोळ म्हणाले, ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित अशी पोस्ट त्यांनी केली आहे. “पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे. सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत. असेही मंत्री मोहोळ म्हणालेत.”
‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित…
पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 24, 2024
या संपूर्ण प्रकारणात आतापर्यंत पबचालकासह 5 जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर पोलीसांनी संबंधित पब, बार, सील केला आहे तसेच याप्रकरणी दोन पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.