पुणे : शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता हिंगणे खुर्द येथे पिस्टल बाळगून बाचाबाची करणार्या तिघांना सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
राज रवींद्र जागडे (वय-२२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. तर आरोपीच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार स्वप्निल मगर, विनायक मोहिते व शिवाजी क्षीरसागर यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, दोन ते तीन जणांकडे गावठी पिस्टल असून ते नवीन कॅनॉल परिसरातील रोडवरील आनंदवन हेरिटेज बिल्डिंगच्या जवळ उभे आहेत. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक तात्काळ खासगी गाडीने तेथे निघाले. ते हिंगणे खुर्द येथे पोहचले. तेव्हा त्याठिकाणी तिघे जण एकमेकांसोबत बाचाबाची करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांची आणि आरोपींची एक नजर होताच ते पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना काही अंतरावरच पकडले. राज जागडे याच्या अंगझडतीमध्ये ४० हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यातून ४० हजार रुपयांचे पिस्टल व तीन जिवंत काडतुस मिळाले आहे. राज जागडे याच्याविरुद्ध यापूर्वी देखील राईटचा गुन्हा दाखल आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर,बाबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, पंकज देशमुख, अमोल पाटील, विनायक मोहिते,स्वप्निल मगर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विका बांदल यांच्या गुन्हेशाखेच्या पथकाने केली आहे.