पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्यादिवशी ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना बुधवारी (ता. ६) शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली.
ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांच्यासह सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मधील कैद्यांच्या सुरक्षेसाठी या दोघांची नेमणूक केली होती. दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी ललित पाटील पसार झाला. या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत ११ पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले होते. कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि अमित सुरेश जाधव या दोघांना यापूर्वीच बडतर्फ केले होते. आता अन्य दोघांवर कारवाई कली आहे. या कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ललित पाटील प्रकरणात यापूर्वी त्याचा भाऊ भूषण अनिल पाटील, अभिषेक उल्हास बलकवडे (दोघेही रा. नाशिक), सुभाष जानकी मंडल (वय-२९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय-१९, रा. ताडिवाला रस्ता), जिशान शेख, प्रज्ञा अरुण कांबळे आणि अर्चना किरण निकम, पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय विवेक अर्हाना (वय ५२, रा. १४, डॉ आंबेडकर मार्ग, कॅम्प), अर्हानाचा ड्रायव्हर दत्ता डोके, अरविंद लोहारे आदी २८ जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. पोलिसांनी ललित पाटीलच्या घराची झडती घेत कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त केले होते. यासोबतच त्याच्या वापरातील गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ललित पाटील याला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस येते आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतली आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणाची कसून तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहायक फौजदार रमेश काळे, पोलीस अंमलदार विशाल बाबूराव टोपले, स्वप्निल चिंतामण शिंदे, दिगंबर विजय चंदनशिव यांना निलंबित केले होते. तर, ससूनमधून ललितच्या पलायन प्रकरणात सहायक निरीक्षक सविता भागवत, पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हेड कॉन्स्टबल आदेश सिताराम शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम भारत काळे, पिरप्पा दत्तू बनसोडे, अमित सुरेश जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.