पुणे : गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी सहभागी होताना दिसून येत आहेत. दहशत निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी कोयते घेऊन फिरणे, अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले असून देखील त्याचा भंग करुन शहरात आलेल्या दोघा गुंडांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय सुनिल येवले (वय-२३, रा. भेंडी चौक, कृष्णकुंज, आंबेगाव बुद्रुक) तसेच ऋतिक दत्तात्रय चव्हाण (वय-२२, रा. गोसावी वस्ती, कोथरुड) अशी या तडीपार गुंडांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी अक्षय येवले याला १७ नोव्हेंबर २०२४ पासून २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असून, तो पुन्हा शहरात आला होता. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस हवालदार लहु सूर्यवंशी यांना याची माहिती मिळतच त्यांनी लगेच आरोपीला शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिस पथकाने गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी अक्षय याला आंबेगाव येथील भेंडी चौकातून ताब्यात घेतले आहे.
तर पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी ऋतिक दत्तात्रय चव्हाण याला १५ नोव्हेंबर २०२४ पासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातून तडीपार केले होते. असे असून, तो तडीपारीचा भंग करुन पुणे शहरात परत आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलिस अंमलदार हरीश गायकवाड यांना याची बातमी मिळताच त्यांनी गोसावी वस्ती येथे जाऊन ऋतिक चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतले आहे.