वारजे (पुणे) : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर डुक्कर खिंडच्या पुढे असणाऱ्या उड्डाणपुलावर चांदणी चौकाच्या दिशेने जात असलेल्या भरधाव मोटारीने दुभाजकाला रंगरंगोटी करत असलेल्या दोन कामगारांना उडवल्याची घटना घडली. काही क्षणातच कारच्या बाेनेटवरून उडून पुलाच्या कठड्यावरून ४० फूट खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना वारजे येथे घडली आहे. या अपघातात कारमध्ये असलेले चौघे देखील जखमी झाले आहेत.
सनी गौड (वय २३, रा. सिद्धार्थनगर, युपी) आणि विजय बहादूर मटरू चौहान (वय २८, रा. वाराणसी, दोघेही सध्या रा. चिखली) अशी मयतांची नावे आहेत, तर लक्ष्मण त्रिंबक देशमुख (वय ६३, रा. धाराशिव), अशोक त्रिंबक देशमुख (वय ५६, रा. शाहूनगर, पिंपरी), रोहिणी अशोक देशमुख (वय ५०), सविता सुरेश मंत्री (वय ५०, रा. केळेवाडी कोथरूड) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारचालक बाळू महादेव शिंदे (वय ३४, रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरूद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ३० जानेवारीला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास देशमुख कुटुंबीय नऱ्हे भागातून आपल्या घरी पिंपरी येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची अल्टो कार डुक्कर खिंडीपासून पुढे वसुधा ईताशा सोसायटीच्या समोरील उड्डाणपुलावर आली. यावेळी भरधाव असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला दुभाजकाला पेंट मारत असलेल्या दोन कामगारांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही कामगार कारच्या बोनेटवरून उडून कठड्यावरून सुमारे ४० फूट खाली फेकले गेले.
यातील एकजण तर पुलापासूनही ३० फूट लांब खाली रस्त्यावर फेकला गेला. दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत आणि कारमधील जखमींना जवळच्या माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक तृप्ती पाटील करीत आहेत.