पिंपरी: दोन तळीरामांनी पीएमपी बस थांबवून चालकाला दमदाटी करत चालत्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बस वाकडी तिकडी चालवल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे बसची अनेक वाहनांना व नागरिकांना धडक बसली. या प्रकारामुळे बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांच्या जिवाचा थरकाप उडाला. ही घटना बुधवारी 17 जुलै रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली. सचिन गुणाजी पारधे (वय 44, रा. पुणे स्टेशन) यांनी बुधवारी 17 जुलै रोजी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी संतोष जाधव (वय 40), जितेश रमेश राठोड (वय 36, रा. महाळुंगे, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत असणाऱ्या आरोपींनी पीएमपी बसला हात दाखवला. बसमध्ये चढल्यानंतर दोघांनी बस चालक सुरज सुखलाल काळे (वय 24) यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच चालकाच्या केबिनमध्ये जात आरडाओरडा केला आणि बसचे स्टेअरिंग आरोपींनी त्यांच्या हातात घेतले. आम्ही सुद्धा बस चालक आहोत, तू आम्हाला शिकवू नकोस, असे म्हणत आरोपींनी बस वाकडी तिकडी चालवत समोरील अनेक वाहनांना व नागरिकांना धडक दिली. फिर्यादी यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ केली. तसेच नखे ओरखडून जखमी केले. घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी घाबरले होते.