भिगवण, ता 11: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पल्सर मोटारसायकल वरून पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाताना भिगवणमध्ये संगम वाईन्सच्या समोर दुचाकी वरील असणाऱ्या जोडप्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील जोडपे गंभीर जखमी झाले आहे. दीपक सूर्यवंशी (राहणार लातूर) अंकिता घोडके (राहणार हैदराबाद) अशी जखमींची नावे आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सदरील जोडपे हे पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने आपल्या ताब्यातील पल्सर (गाडी क्र माहीत नाही) या वाहनावरून निघाले होते. भिगवणमध्ये संगम वाईन्सच्या समोर आले असता अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर सदरील वाहन घटनास्थळावरुन तसेच वेगाने निघून पुढे गेले.
अपघात घडल्यानंतर मोटरसायकल वरील दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडलेले होते. याची माहिती आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांना दिली असता तात्काळ घटनास्थळी जाऊन आपल्या ॲम्बुलन्स मधून दोन्ही जखमींना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते.
अपघातातील जखमींची नावे दीपक सूर्यवंशी (राहणार लातूर) अंकिता घोडके (राहणार हैदराबाद) अशी असून दोघांची प्रकृती गंभीर असून नातेवाईकांना संपर्क करण्याचे प्रयत्न चालू आहेत.