सासवड (पुणे ) : भोर तालुक्यातील किकवीकडून कापूरहोळ मार्गे सासवडकडे जाणारी वॅगनर कार आणि सासवडकडून कापूरहोळकडे निघालेला ट्रक यांच्यात चीव्हेवाडी जवळील देवडी येथे जोरदार धडक झाली. धडक होताच कार थेट ट्रकच्या खाली गेली. या अपघातात कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे (वय २८. रा. किकवी, ता. भोर) आणि तृप्ती अक्षय जगताप (वय २६. रा. सुपे खुर्द ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर (रा. धावडी, ता. भोर) हे जखमी झाले आहेत. याबाबत रोहिदास पांडुरंग लेकावळे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिवाजी लेकावळे हे हडपसर येथील एका कंपनीत कामाला असून नेहमीप्रमाणे ते त्यांची कारमधून सकाळी लवकर कामाला निघाले होते. तसेच तृप्ती अक्षय जगताप त्यांच्या माहेरी किकवी येथे आल्या होत्या. लेकावळे यांच्या शेजारीच त्यांचे माहेर असून त्यांच्याच गाडीत बसून सासवडकडे निघाल्या होत्या.
दरम्यान सकाळी ८.३० च्या दरम्यान कार पुरंदर तालुक्यातील देवडी गावच्या हद्दीतील पहिल्या वळणावर असताना समोरून येणाऱ्या ट्रकवरील चालकाने समोरासमोर धडक दिली. यानंतर कार थेट ट्रकच्या खाली घुसून दबली गेली. त्यामुळे चालक गणेश लेकावळे यांच्यासह शेजारच्या सीटवरील बसलेल्या तृप्ती जगताप यांना जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच सासवडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान या अपघातात ट्रक आणि कार यांची धडक झाल्यानंतर महिलेच्या मांडीवरील दोन वर्षाचा कृष्णा मागच्या सीटवर फेकला गेला. त्यामुळे त्याला काही प्रमाणात दुखापत झाली व सुदैवाने तो वाचला.