चाकण : कंटेनर, मिनी टेम्पो व कार या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात टेम्पोतील दोघेजण जागीच ठार झाले. चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीत बुधवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हा विचित्र अपघात घडला. या अपघातात कंटेनरच्या धडकेत दूरवर फेकल्या गेलेल्या टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला. तर दोघांचे मृतदेह टेम्पोच्या सांगाड्यात अडकून पडले होते.
चेतन शाळीग्राम अहिरे (वय २४, सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, मुळ रा. बुलढाणा) व गणेश मारुती पानसरे (वय ४२, रा. बहुळ, ता. खेड) असे या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, शिक्रापूर बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची समोरून येणाऱ्या टेम्पोला आणि कारला जोरात धडक बसली. कंटेनरच्या धडकेत दूरवर फेकल्या गेलेल्या टेम्पोचा अक्षरश चक्काचूर झाला.
तर यामध्ये टेम्पोतील दोघे तरुण जागीच ठार झाले. या दोघांचे टेम्पोच्या सांगाड्यात मृतदेह अडकून पडले होते. हे मृतदेह काढणे देखील अवघड झाले होते. सुदैवाने कार मधील सर्वजण बालंबाल बचावले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घटना स्थळावरून गायब झाला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.