पुणे:शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. त्याशिवाय राज्यातील विविध गड-किल्ल्यांना शिवभक्त भेट देत आहेत. अशातच रायगडावर एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकल्याचे समोर आले आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त येत आहेत. रायगडावर गेलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले आहेत. ते तेथे कसे पोहोचले हे समजू शकलेले नाही. तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे.
रोपवेच्या मार्गाने जात असताना काही शिवभक्तांना हे तरुण हिरकणी कड्यावर अडकलेले दिसले. हिरकणी कड्यावरून गडावर परत जाणे किंवा खाली उतरणे कठिण असल्याने एका दगडाचा आधार घेत दोघेही जीव मुठीत घेऊन थांबले होते. रुमालाच्या इशाऱ्याने त्यांनी लोकांचे लक्ष वेधले. तसेच आरडाओरडा करत सुटका करण्याची विनवणी करत होते. तरुणांची सुटका करण्यासाठी महाडमधील एका रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत या तरुणांच्या सुटकेसाठी पर्याय शोधण्यात येत आहे.
किल्ल्यावर पोहोचण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच मार्गामुळं ते अडचणीत सापडले आहेत. नसत धाडस या तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.