पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन अज्ञात आरोपींनी धुडगूस घालत हॉटेल कर्मचारी व त्याच्या भावावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना चिखली येथील पवार वस्तीमधील दोस्ती हॉटेलमध्ये गुरुवारी (दि. १७) रात्री सव्वानऊ वाजता घडली. कन्हैया अशोक रस्तोगी (वय १९, रा. पवार वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वृषभ मानके व घनश्याम यादव (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या दोघांजणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे दोस्ती हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल मालक बालाजी पांचाळ कोठे आहे, असे विचारले. बालाजी पांचाळ तेथे नसल्याचे समजल्यावर, काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपींनी पाण्याचे जार फेकून दिले व शिवीगाळ केली. त्यानंतर हॉटेलमधील टेबल फोडून, तसेच छातीवर व बांबूने डाव्या पायावर मारहाण करून जखमी केले. तसेच अर्जुन रस्तोगी याच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. दोघांनी हॉटेलमधील खुर्चा, टेबलांची तोडफोड करून पळ काढला. चिखली पोलिस तपास करीत आहेत.