नारायणगाव : वारूळवाडी गावच्या हद्दीत पुणे-नाशिक रोडवर अॅम्ब्युलन्सचा सायरन वाजविल्याच्या कारणावरून अॅम्ब्युलन्स चालकाला गंभीर मारहाण करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अॅम्ब्युलन्सचे चालक सोमनाथ भास्कर गायधने (वय ३२ रा. कडाचीवाडी चाकण, ता. खेड राजगुरुनगर जि. पुणे) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धनेश तळपे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व दुसरा इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. ७) सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक हायवे वरील वारूळवाडी येथील माऊली मिसळ हाऊस समोर अॅम्ब्युलन्सचे सायरन वाजविल्याच्या कारणावरून पल्सर मोटार सायकलवरील दोन जणांनी संगणमत करून अॅम्ब्युलन्स गाडीला आडवे आले. तू सायरन का वाजवतो, असे म्हणून सोमनाथ यांना अॅम्ब्युलन्समधून ओढून खाली पाडून हाताने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच धनेश तळपे याने त्यांच्या हातात चावी धरून सोमनाथ यांच्या उजव्या डोळ्यावर मारून दुखापत केली. या घटनेत दुसरा इसम स्वयंघोषित पत्रकार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत