पुणे : बिबवेवाडी परिसरात सोमवारी (दि. ६) सायंकाळी रागाने बघण्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांनी एका तरुण अभियंत्यावर सशस्त्र हल्ला करून त्याचा पंजा उडवला. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यासंदर्भात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या साथीदाराविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सागर सरोज (वय २१, रा. वडकी नाला) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमध्ये पियूष पाचकुडके (वय २२, रा. बिबवेवाडी) हा तरुण अभियंता गंभीर जखमी झाला. या संदर्भात गौरव राजेश मरकडे (वय २४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील शिवतेज क्रीडा संघ चौकात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. गौरव, व पियूष यांची आरोपींशी किरकोळ कारणावरून भांडण, बाचाबाची झाली होती. ते दोघे सोमवारी सायंकाळी “शिवतेज क्रीडा संघ चौकात आले असताना आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला हाताने रोखण्याचा प्रयत्न पियूषने केला. त्या वेळी कोयत्याचा जबरदस्त घाव बसून त्याच्या उजव्या हाताचा पंजा तुटून हातापासून वेगळा झाला.
आरोपींनी दोघांच्या डोक्यावर व पायावर कोयत्याने वार केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथे दोघांवरही तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. वारजे परिसरातही दोन आठवड्यांपूर्वी अशाच हल्ल्यात एका तरुणाचा पंजा उडवण्यात आला.