पिंपरी : चोरीच्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. यामध्ये जावई चोरी करायचा आणि त्याने चोरलेला मुद्देमाल सासू विकत असल्याचे समोर आले. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे सुमारे ९ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सादिक शमल खान इराणी (वय ३४, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), नर्गिस जाफर इराणी (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्जनस्थळावरून पायी जाणाऱ्या महिलांची रेकी करून तोंडाला मास्क, हेल्मेट घालून बनावट नंबरप्लेट अथवा विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून येणारे चोरटे दागिने हिसकावून धूम स्टाईलने पळून जात होते. अशा घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यानुसार सोनसाखळी चोरी करणारा एक इराणी गुन्हेगार निगडीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निगडीतील ट्रान्सपोर्ट नगरमधून सादिक इराणी आणि त्याच्या सासूला ताब्यात घेतले.
सादिक इराणी याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे ९ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्यावर चेनचोरी, बतावणी करून फसवणूक आणि इतर असे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तर, सादिक अहमदनगरचा असून एका मित्रासोबत मिळून तो चोऱ्या करत असे. त्याने चोरलेले दागिने त्याची
सासू नर्गिस इराणी हिच्याकडे देत असे. नर्गिस चोरलेले दागिने विकत होती. सादिक सासूला घेऊन चोरीचे दागिने विक्रीसाठी आला होता. त्यावेळीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, उपनिरीक्षक महादेव यलमार, पोलीस अंमलदार नागरगोजे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक केराप्पा माने, शिवानंद स्वामी, दीपक खरात, दिलीप चौधरी, उषा दळे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उद्धव खेडकर यांनी ही कारवाई केली.