जुन्नर: महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ८ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकूण ७,१६,७९३ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच सदर आरोपींकडून जबरी चोरीचे पाच गुन्हे देखील उघडकीस आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर पोलीस स्टेशन गुरनं. १०४/२०२५ BNS ३०९ (४), ३ (५) प्रमाणे अकरा मार्च रोजी गुन्हा घडलेला होता. सदर गुन्हयातील फिर्यादी इंदूबाई विठ्ठल पानसरे (वय ६० वर्षे, व्यवसाय शेती, घरकाम, रा. पिंपळगाव सिद्धनाथ ता. जुन्नर जि. पुणे) या पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेशखिंड रोडने जुन्या घराकडे पायी जात असताना मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व माळ असा एकूण १,८०,००० किंमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले होते. त्याबाबत फिर्यादीने जुन्नर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतररित्या सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी स्प्लेंडर मोटार सायकलचा वापर केल्याचे निष्पन्न करून सदरची मोटार सायकल ही शिरूर बाजुकडे गेली असल्याचे तपासात दिसून आले. त्याअनुषंगाने पथकाने शिरूर परिसरातील गोपनीय बातमीदारामार्फत संशयित मोटार सायकल ही अनिल सोमनाथ गव्हाणे व अनिल नारायण गव्हाणे हे वापरत असून ते दानेवाडी परिसरात असतात्, अशी माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने २८ मार्च रोजी शिरूर परिसरात सापळा लावून अनिल गव्हाणे (वय ३१ वर्षे, रा. गव्हाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर) आणि अनिल नारायण गव्हाणे (वय २५ वर्षे रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांना विश्वासात घेवनू चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी जुन्नर, शिक्रापूर, शिरूर, आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व ८ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ७,१६,७९३ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली परि. उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी जुन्नर पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, स्थागुशाचे पोसई अभिजीत सावंत, सपोनि अरविंद गटकुळ, स्थागुशाचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीण, सागर नामदास, वैभव सावंत, निलेश सुपेकर यांनी केली.