पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपींना पिस्टल पुरवणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. मोहोळवर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीत तीन वेळा सराव केला होता.
पाच जानेवारी रोजी शरद मोहोळ याचा पुण्यातील कोथरूड परिसरातील त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता आणखी दोन जणांना अटक केली. या दोघांनी मोहोळचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल आरोपींना पुरवले असल्याची माहिती आहे. धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावे आहेत.
दरम्यान शरद माहोळची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीमध्ये गोळीबाराचा सराव केला होता. शरद मोहोळला मारण्यासाठी एका व्यक्तीकडून तीन पिस्तुले आणि 11 काडतुसे खरेदी केली. मोहोळवर हल्ला करताना अचूक निशाणा साधता यावा, म्हणून पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी सराव देखील केला होता. शरद मोहोळच्या खुनाच्या पाठीमागे कोणत्या टोळीचा हात आहे का? हे देखील पोलीस पडताळून पाहत आहेत. शरद मोहोळचा खून टोळीयुद्धाच्या संघर्षातून तर झाला नाही ना? असा ही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता
शरद मोहोळचा पाच जानेवारी भरदुपारी कोथरूडमधील सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. या सर्व आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला होता. आता या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच, शरद मोहोळसाठी यमदूत बनून आले आणि त्याचा खात्मा करून गेले.