पुणे : इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्याचा चाकूने भोसकून खून करणाऱ्यांच्या २४ तासांत मुसक्या आवळल्या. आरोपीला मंगळवारी (दि. २३ एप्रिल) उत्तर प्रदेशातून अटक केली. पंकजकुमार मोती कश्यप (वय ३५, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राज ऊर्फ सुरेश मनीराम आर्या (वय ३४, सध्या रा. महंमदवाडी) व भोलेनाथ राजाराम आर्या (वय २६, सध्या रा. लेबर कॅम्प, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पंकज यांची पत्नी मीनाकुमारी कश्यप यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना मयत पंकज याला घटनास्थळी बोलावून घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्याला बोलावून घेणाऱ्या संशयितापैकी राज ऊर्फ सुरेश आर्या हा मंगळवारी रात्रीच काही मजुरांसमवेत उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजले. पकंज हा आरोपी राज ऊर्फ सुरेश आर्या याच्यासोबत पूर्वी काम करायचा. दोघांनी मिळून मूळ गावी उत्तर प्रदेशात एकत्रित जमीन खरेदी केली आहे. ती जमीन मयत पंकज याच्या नावावर असून ती सुरेश याच्या नावावर करून देण्यास विरोध करत होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाले होते. पोलिसांच्या पथकाने बांधकाम साइटच्या रस्त्यावरील ४२ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर संशयावरून पोलिसांनी भोलाराम याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आरोपी सुरेश याच्यासोबत पंकजचा खून केल्याचे कबूल केले.