शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे एका महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीचा वारंवार पाठलाग करत तिच्या घरी जाऊन विनयभंग केल्याची, तसेच युवतीला तोंडावर अॅसिड फेकण्यासह घरच्यांना मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी सनी उर्फ ओंकार अरुण कांबळे (वय २४) व जायेद जब्बार इनामदार (वय २० दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर) या दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील महाविद्यालयीन अल्पवयीन युवती कॉलेजला जात असताना दोघा आरोपींनी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने युवतीचा पाठलाग केला. युवती घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या घरात जात युवतीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तर सनी उर्फ ओंकार याने युवतीच्या भावाला, तर जायेद याने युवतीच्या तोंडावर अॅसिड फेकण्याची तसेच कुटुंबियांना संपवण्याची धमकी दिली.
याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.