पुणे : पाषाण-सूस टेकडीवर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी रविवारी (दि. ६) अटक केली. आरोपीकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला. अजिंक्य अशोक बोबडे (वय १८, रा. गुरुकृपा बिल्डींग, वाघजाई चौकाजवळ, नवी सांगवी) व निखिल बाबासाहेब डोंगरे (वय १८, रा. साकेत सोसायटी, डीपी रस्ता, औंध) ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पौजेंदाई कामेई (वय १९, सध्या रा. गंगानगर, जुनी सांगवी) याने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कामेई मूळचा नागालँडचा आहे. कामेई आणि त्याचा मित्र समीर रॉय २८ सप्टेंबर २०२४ ला पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी बोबडे, डोंगरे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दोन मोबाइल फोन व रोकड असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडून नेला. या गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलिसांनी बोबडे, डोंगरे यांच्यासह अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी लुटमारीचे आणखी काही गुन्हे केले आहेत? किंवा कसे ? याबाबत तपास जारी करण्यात आला आहे.