पुणे: कात्रज परिसरातील हॉटेल चालकांकडून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. निखिल सुनील शिंदे (वय ३०), सिद्धार्थ राहुल रणपिसे (वय २८, दोघे रा. समता सोसायटी, सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विश्वनाथ पद्मनाभ पुजारी (वय ५७, रा. आंबेगाव-नन्हे रस्ता, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
पुजारी यांचे कात्रज परिसरात सातारा रोडवर जंक्शन नावाने बार आहे. आरोपी शिंदे व रणपिसे कात्रज चौक परिसरातील रेस्टॉरंट आणि बारचालकांना भेटले. तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहेत, तुमच्या हॉटेलला पार्किंग व्यवस्था नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यात येणार आहे, अशी धमकी आरोपींनी दिली. पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हॉटेल, बारचालकांना धमकावून त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुजारी यांच्यासह अन्य हॉटेलचालकांनी पोलिसांकडे तक्रार केली.