बारामती : बारामती बसस्थानकावर बाहेरगावच्या प्रवाशांना गाठून धमकावणाऱ्यांना शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडे दाखल गुन्ह्यासंबंधी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. ऋषिकेश नंदकुमार पवार व करण संभाजी चव्हाण (रा. शारदानगर, ता. बारामती) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सांगवी (ता. फलटण) येथील एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दाखल केली होती.
गुरुवारी (दि. ३) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अल्पवयीन मुलगा एसटी बसस्थानकावर फलाट क्र. ११ येथे बसची वाट बघत थांबला होता. बारामती-फलटण बस आल्यावर तो बसमध्ये बसण्यासाठी जात असताना पाठीमागून दोन अनोळखी तरुण आले. त्यातील एकाने फिर्यादीचा हात पकडला, तर दुसऱ्याने पाठीत हाताने मारहाण केली. तुम्ही मला का मारत आहात ? माझी काय चूक आहे, अशी विचारणा फिर्यादीने केली. त्यावर त्यांनी ‘तुला आता सोडणार नाही, आम्ही तुला मारणार’ असे म्हणत त्याला दोन्ही हातांनी धरून ओढत स्थानकातील कँटीनच्या पाठीमागे नेले. तेथे त्याला मारहाण करून धारदार तलवार काढत तुला आता जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.