पिंपरी: पिंपरी-चिंचवड (Pimpri Crime) शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पुन्हा एकदा स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा भांडाफोड केला आहे. पिंपळे निलख येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी तीन तरुणींची सुटका तर दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया अशोक जाधव आणि निखिल मोहन नवघन असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख परिसरातील ब्रह्मावृंद कॉलनीत असलेल्या जेपी फॅमिली स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला गुप्त पद्धतीने मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला आणि बनावट ग्राहक पाठवून शहनिशा केली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका केली आहे. त्यानंतर पोलिसांनी जया अशोक जाधव आणि निखिल मोहन नवघन या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७० (३),३४ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक धैरशील सोळंके, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.