पुणे : पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असं असतानाच शहरामध्ये आणखी खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत. हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आणि नातवाने बेदम मारहाण करुन एका ६० वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. तर, एका अनोळखी व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारहाण करुन खून केल्याची दुसरी घटना हडसपर भागात घडली आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेत मंगल मोहन नेटके (वय-६० रा. कामराजनगर) या महिलेचा खून झाला आहे. याबाबत संध्या अरुण वाघमारे (वय-५० रा. कामराजनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मयत महिलेचा मुलगा मयुर मोहन नेटके (वय-३०) आणि १० वर्षीय नातवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मंगल नेटके या मावशी आहेत. सोमवारी १३ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयुर आणि नातु यांनी मंगल नेटके यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशे मागितले होते. मात्र, मृत मंगल यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या मावशीला लाकडाने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्यालय मंगल नेटके यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी १५ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दुसरी घटना हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत घडली आहे. अज्ञात व्यक्तीने एका तरुणाचा शुल्लक कारणावरुन डोक्यात आणि शरिरावर धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र रामभाऊ शेजुळ (वय-३५ रा. कडनगर, चौक, उंड्री) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी राजेंद्र यांची पत्नी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (वय-२९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे करीत आहेत.