लोणी काळभोर : मागील सहा दिवसांत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथून एक तर कोरेगाव मूळ येथून दुसरी व्यक्ती बेपता झाली होती. यातील लोणी काळभोर येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह माळीमळा जवळ असलेल्या रेल्वे रुळावर आढळला आहे.
प्रफुल्ल पांडुरंग क्षिरसागर (रा. सोमेश्वर मंदिराजवळ, माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे रेल्वे रुळावर मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रविण गोविंदा पाटील (वय- ४०, कोरेगांव मूळ, ता. हवेली) ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी गौतम पांडुरंग क्षिरसागर (वय ३८) व पवन गोविंदा पाटील (वय ३१, रा. मु. पो. संगमनगर, जि. सातारा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम क्षिरसागर यांचा भाऊ प्रफुल्ल याने गुरुवारी (ता. ११) त्याचे सलूनचे दुकान बंद ठेवले होते. तेव्हा गौतम याने प्रफुल्ल याला फोन करुन, दुकान का बंद ठेवले, सध्या कोठे आहे, याबाबत विचारणा केली. त्यावेळी गौतमला प्रफुल्लच्या आवाजातून जाणवले की, त्याने मद्य प्राशन केले आहे. प्रफुल्लने काहीच न सांगितल्याने गौतमने त्याचा शोध घेतला. त्यावेळी पुणे-सोलापूर रस्त्यालगत राजेंद्र बीअरबारमध्ये गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो बसलेला दिसला.
त्यानंतर गौतमने प्रफुल्लची समजूत काढत सांगितले की, तुला आताच दोन दिवस झाले आहेत. नवीन सलून टाकून दिले आहे. सारखे दुकान बंद ठेऊ नकोस, हे योग्य नाही. गौतमने घरी चल असे सांगितले. परंतु, प्रफुल्ल म्हणाला की, ‘तू घरी जा, मी मागून येतो.’ परंतु तो संध्याकाळी घरी आलाच नाही व दुसऱ्या दिवशीही घरी आला नाही. या प्रकरणी गौतम क्षिरसागर याने प्रफुल्ल बेपत्ता झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, प्रफुल्ल क्षिरसागरचा मृतदेह माळीमळा जवळ असलेल्या रेल्वे रुळावर आढळला आहे. मात्र, प्रफुल्लचा अपघात झाला, घातपात झाली की प्रफुल्लने आत्महत्या केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत बेपत्ता असलेला प्रविण पाटील हा कुटुंबासोबत कोरेगाव मूळ येथे राहण्यास असून, पुना रोलर फ्लोअर मिल येथे कामाला आहे. प्रविण व त्याच्या पत्नीचा पैशाच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. प्रविण हा गुरुवारी (ता. ११) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रागाने घरातून निघून गेला. तो पुन्हा घरी परतलाच नाही. या प्रकरणी प्रविणचा भाऊ पवन याने प्रविण बेपत्ता झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अमोल घोडके करीत आहेत.