पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात तब्बल २ लाख ७ हजार ४४३ मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नवमतदारांची संख्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार झाले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार नवमतदार नावनोंदणी, दुरुस्ती तसेच नवीन छायाचित्रासंदभांत विविध मोहीम, जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीमध्ये ८३ लाख ३८ हजार ४७४ मतदारसंख्या होती. नावनोंदणीनंतर प्रारूप मतदारयादीमध्ये ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदारसंख्या झाली होती. त्यानंतर २८ ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदारयादीवर हरकती, सूचना घेण्याबाबत मुदत देण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यात चिंचवड हा सर्वाधिक मतदारसंख्येचा विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. ६ लाख ४३ हजार ७६९ एवढे मतदार या मतदारसंघात असून, त्या खालोखाल ६ लाख ८ हजार १७४ मतदार हडपसर मतदारसंघामध्ये आहेत.
पुणे जिल्ह्यात सर्वांत कमी दोन लाख ८१ हजार ३०० मतदार कसबा पेठ मतदारसंघात असून, तो मतदारसंख्येने सर्वात लहान विधानसभा मतदारसंघ आहे. मतदारांमध्ये पुरुष मतदारांची संख्या ४४ लाख ९१ हजार ६८ तर ४१ लाख ५५ हजार ३३० महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय ७७४ तृतीयपंथी मतदार आहेत.
जिल्ह्यामध्ये ८४१७ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांमध्ये आणखी नव्याने शंभर केंद्रांची भर पडेल, निवडणूक आयोगाने सोसायटीमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यास परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यात मतदान केंद्रांची फेररचना करण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
जुन्नर : ३ लाख २० हजार ४७०, आंबेगाव : ३ लाख ९ हजार २०६, खेड आळंदी: ३ लाख ६६ हजार ८७३, शिरूर : ४ लाख ५५ हजार ५४०, दौंड: ३ लाख १३ हजार ११०, इंदापूर: ३ लाख ३३ हजार ३०, बारामती : ३ लाख ७५ हजार १५२, पुरंदर: ४ लाख ५१ हजार ८००, भोर : ४ लाख २१ हजार ५५३, मावळ: ३ लाख ७८ हजार ८४४, चिंचवड: ६ लाख ४३ हजार ७६९, पिंपरी : ३ लाख ८३ हजार ८३४, भोसरी: ५ लाख ८६ हजार ८५५, वडगावशेरी: ४ लाख ८९ हजार ४९४, शिवाजीनगर: २ लाख ८९ हजार ७६२, कोथरूड: ४ लाख ३१ हजार ६५१, खडकवासला: ५ लाख ६१ हजार ९५५, पर्वती: ३ लाख ५४ हजार ६५, हडपसर : ६ लाख ८ हजार १७४, पुणे कॅण्टोन्मेंट: २ लाख ९० हजार ६९८, कसबा पेठ : २ लाख ८१ हजार ३००.