पुणे : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २६) रात्री सव्वा बाराच्या दरम्यान घडली आहे.
दीपक परशुराम पवार (वय २८) व लक्ष्मण तातुराम वाघमारे (वय ३०, दोघे रा. सावरोली, खोपोली, जि. रायगड) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी नितेंद्र कदम यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, दीपक आणि लक्ष्मण हे दोघे साडू असून लोणावळ्याजवळील देवघर येथील एका वीटभट्टीवर कामगार होते. ते काही कामानिमित्त त्यांच्या गावी गेले होते. रविवारी (ता. २६) रात्री ते पुन्हा गावाहून मोटारसायकलवर (एमएच ०६ एएम ६३९५) देवघरहून परत येताना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत दोघांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी नितेंद्र कदम यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.