लोणी काळभोर : आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. लोणीकंद पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
गौरव ऊर्फ गोट्या महादेव सातव (वय ३१, रा. डोमखेलवस्ती, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि.,पुणे) याला दीड वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तर महेंद्र संभाजी कुटे (वय ३८, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव ऊर्फ गोट्या सातव व महेंद्र कुटे हे दोन्ही गुन्हेगार आव्हाळवाडी व वाघोली परिसरात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरिकांना वारंवार त्रास देत होते. त्यामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवू नये, तसेच सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी ही कारवाई केली.
गुन्हेगारांवरील दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांना पाठविला होता. त्यानंतर विजयकुमार मगर यांनी गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू व शुभम सातव यांनी केली आहे.