पुणे : शहरातील गुन्हेगारी घटनांना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुणे शहरातील वर्दळीच्या सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणाऱ्या दोघां सराईत गुन्हेगारांना खडक पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे.
आरोपी शुभम अनिल शिंदे (रा. महर्षी नगर) व सिद्धेश अशोक शिगवण (रा. व्हेहिकल डेपो शेजारी, गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना मिळालेल्या बातमीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे, गुन्हे निरीक्षक शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईत आरोपीकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.