खेड शिवापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजगड पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकसह 2 जणांना ताब्यात घेतले आहे. ट्रक क्रमांक एम. एच. 05 डी. के. 8167 या वाहनात विमल पानमसाल्याच्या 202 पोत्यांचा समावेश असून त्याची अंदाजे किंमत तब्बल एक कोटी 5 लाख रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजावरून समजते.
राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा एक ट्रक खेड शिवापूर टोल नाक्यावर पहाटे येणार असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, निरीक्षक गवळी यांनी तातडीने पथक स्थापन करून पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ जाधव, अक्षय नलावडे, आणि सचिन नकटे यांच्यासह टोल नाक्यावर नाकाबंदी केली.
या नाकाबंदी दरम्यान, एम. एच. 05 डी. के. 8167 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेण्यात आला. ट्रकची तपासणी केली असता त्यात विमल पानमसाल्याच्या 202 पोत्यांचा साठा सापडला. यानंतर ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास राजगड पोलिसांकडून सुरू आहे.