यवत/राहुलकुमार अवचट : दौंड तालुक्यातील पाटस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गारफाटा येथे जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २६ जानेवारी रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
जाधवराव कुटुंबीयांनी बेकायदेशीर जमाव जमवून हवेत गोळीबार करून बंदुकीचा धाक दाखवून चुलती वंदना भागवत व आजी शकुंतला भागवत यांना धक्काबुक्की केली. विरसिंह उर्फ पिपू जाधवराव याने हवेत गोळीबार केला होता. याबाबत अनिकेत भागवत यांनी पोलीसांत फिर्याद दिली. हॉकी स्टिक, लाकडी दांडके व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे अनिकेत भागवत यांनी फिर्यादीत नमूद केले.
या प्रकरणी धैर्यशील जाधवराव , दिग्विजय जाधवराव, अभिजित जाधवराव वीरसिंह उर्फे पिपु जाधवराव, समीर जाधवराव (सर्व रा.पाटस गारफाटा ता.दौंड जि.पुणे), आसिफ शेख व १ अज्ञात अंगरक्षक ( पुर्ण नाव व पत्ता माहित नाही.) यांसह अज्ञात ३० ते ४० महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर, भागवत कुटुंबातील १० जणांनी तुम्हाला ५ गुंठे जागा दिली परंतु तुम्ही जास्त जागा का वापरता, असे म्हणत धैर्यशील दीपक जाधवराव व दिग्विजय दीपक जाधवराव यास मारहाण केली असल्याची फिर्याद वीरसिंह चंद्रशेखर जाधवराव यांनी दिली. यावरून अभिजीत भागवत, अनिकेत भागवत, कोमल भागवत, गौरी भागवत, शकुंतला भागवत, वंदना भागवत, सोनाली भागवत, मालन भागवत, ललिता भागवत, दिगविजय भागवत (सर्व रा.पाटस गारफाटा ता.दौंड जि.पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंडगर व पोलीस हवालदार देवकाते हे करीत आहेत.