पुणे : मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील कुसुर गाव हद्दीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केल्याने ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस तसेच वरीष्ठ पोलीस अधिका-यांनीही घटनास्थळावर धाव घेतली. कुसूर हद्दीत कामा रिसॉर्ट समोर ही घटना घडली आहे.
या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसूर गावाच्या हद्दीत टाकवे ते खांडी रस्त्यावर बुधवारी (दि.5 जून) च्या रात्री उशीरा ही घटना घडली आहे. यावेळी रात्री सुरवातीला किरकोळ वाद झाले आणि त्यानंतर जोरदार हाणामारी झाली. या वादात एका 26 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह तळेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
पोलीसांनी या घटनेतील आरोपींची नावे निश्चित केली आहे परंतु अद्यापही एकालाही अटक केलेली नाहीयेय. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेबाबत वडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.