पुणे : हडपसरमधील संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअन्वये (मोक्का) केलेल्या कारवाईतील दोन फरारींना पोलिसांनी शनिवारी (दि. २८) लोहगाव विमानतळावर अटक केली. हे दोघे जण गेले काही दिवस नेपाळमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. राहुल बाळासाहेब तुपे (वय ३४, रा. हडपसर) व सागर रमेश धुमाळ (वय ४३, रा. महादेवनगर, मांजरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तुपे व धुमाळ यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतरही हडपसर व मांजरी परिसरात त्यांनी दहशत माजवली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
खंडणी प्रकरणातील फिर्याद मागे घ्यावे, यासाठी हे दोघे तक्रार केलेल्या व्यक्तीला धमकावत होते. जिवाच्या भयाने फिर्यादीने शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांनी दोन्ही फरारी आरोपींना तत्काळ पकडण्याचे आदेश दिले. पसार झालेल्या तुपे व धुमाळ यांचा स्थानिक पोलिसांबरोबरच शहर गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू होता. खंडणीविरोधी पथकाने (युनिट-२) या दोघांच्या काही साथीदारांची धरपकड करून त्यांच्याकडे चौकशी केली. त्याचबरोबर दोघांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्याप्त आले. त्यातून हे दोघे जण नेपाळमध्ये दडले असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर, पोलिसांनी विशेष तंत्राचा वापर केल्यानंतर हे दोघे पुण्याकडे यायला निघाले.
ते नेपाळहून विमानाने लखनऊला गेले. तेथून ते पुण्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाने शनिवारी लोहगाव विमानतळाजवळ सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांना पुढील तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्याच्या पथकाकडे हस्तांतरीत करण्यात आले. फरारी असल्याच्या काळामध्ये तुपे व धुमाळ कोणाच्या आश्रयाने नेपाळमध्ये राहिले? त्यांना अर्थपुरवठा कोणी केला? त्याचबरोबर त्यांचे तेथे कोणी साथीदार आहेत किंवा कसे व तेथे त्यांनी काही गुन्हे केले आहेत का? याबाबतचा तपास पोलिसांनी जारी केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे